इस्लामपूर (प्रतिनिधी) : येथील दरोडा,खून,खूनाचा प्रयत्न, वाटमारी करणारा सराईत गुन्हेगार रवि उर्फ रविंद्र महावीर खोत(३२ रा.अजिंक्यनगर इस्लामपूर) याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने इस्लामपूर पोलीसांनी स्थानबध्द केले. त्याची सांगली कारागृहाकडे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्याच्यावर आतापर्यंत खूनाचे दोन गुन्हे, चोरीचे बारा, विनयभंग एक, दरोडा खूनाचा प्रयत्न, वाटमारीचे चार, असे एकूण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुध्द पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबूले यांनी पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांना झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, वाळू तस्कर, धोकादायक व्यक्ती यांच्यासह अन्य गुन्ह्यातील आरोपींना स्थानबध्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्याप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी खोत याच्या विरुध्द डिसेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन दि. 24 डिसेंबर रोजी खोत याला स्थानबध्द करण्याचे आदेश दिले . त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.