इस्लामाबाद – पाकिस्तानच्या शेजारी इस्लामी देशांसाठी संयुक्त इस्लामी बाजारपेठ करावी अशी मागणी पाकिस्तानातील जमात ए इस्लामी या कट्टरवादी संघटनेने केली आहे.
पाकिस्तान आणि शेजारील इस्लामी देशामी मिळून संयुक्त आर्थिक बाजारपेठ उभी करावी. या आर्थिक बाजाराचे स्वरुप संयुक्त आणि सर्व इस्लामी देशांसाठी एकच असावे. पाकिस्तानने या अर्थिक बाजारपेठेचे नेतृत्व करावे, अशी मागणी जमात ए इस्लामीचे अध्यक्ष सिराज उल हक यांनी केली आहे. सर्व इस्लामी देशांसाठी संयुक्त सुरक्षा दलही असावे, अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे.
संपूर्ण मुस्लीम विश्वासाठी इराण आणि सौदी अरेबियातील तणाव ही एक चिंतेची बाब आहे. या दोन्ही देशांमदील वाद मिटवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सर्व इस्लामी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची “मुस्लीम उम्माह’ ही परिषद बोलावणे हे एक सकारात्मक आणि विधायक पाऊल होते. मात्र त्यामुळे अपेक्षित तो परिणाम साधला गेला नाही, असेही सिराज उल हक यांनी म्हटले आहे.
इराण हा अमेरिकेच्या दहशतवादाचा बळी ठरला आहे. सर्व इस्लामी देशांचे प्रश्न संपवण्यासाठी सर्व इस्लामी देशांची एकजूट आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.