इस्लामी देशांची आपत्कालीन बैठक; इस्रायल-हमासच्या संघर्षाबाबत चर्चा

दुबई – इस्रायल आणि गाझा पट्ट्यातील्‌ हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत इस्लामी सहकार्य संघटनेने आज एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. मध्यपूर्वेतील संघर्षाला संपवण्यासाठी हे पहिले मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

पॅलेस्टाईन लोकांना त्यांचे स्वतंत्र राज्य हवे, असे अरब लीग आणि सौदीतील “ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ यासारख्या संघटनांचे म्हणणे आहे. मात्र इस्राईलने नुकतेच या संघटनेतील अनेक सदस्यांशी करार केला आहे. या बैठकीमध्ये हमासबाबतही चिंता व्यक्‍त केली गेली.

हमासवर यापूर्वी गेल्या दशकभरात झालेल्या हल्ल्यांना या सदस्य देशांनी पूर्वी जोरदार विरोध केला होता. मात्र, यावेळी झालेल्या हल्ल्यांना काहीसा निःशब्द प्रतिसाद मिळाला आहे.

पॅलेस्टाईन लोकांची वेदना म्हणजे इस्लामिक विश्‍वाची भळभळती जखम असल्याचे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार म्हणाले, तर इस्रायलचा ताबा असलेल्या वेस्ट बॅंक भागातील स्वायत्त प्रदेशावर प्रशासन असलेल्या पॅलेस्टिनियन ऍथोरिटीचे परराष्ट्रमंत्री रियाद माल्की यांनी इस्रायलच्या भ्याड हल्ल्यांचा निषेध केला आणि इस्रायलचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले.

मात्र, माल्की यांच्या पॅलेस्टिनियन ऍथोरिटीचे हमासवर आणि गाझा पट्टयावर काहीच नियंत्रण नाही. गाझा पट्टयावर हमासचे 2007 पासून नियंत्रण आहे. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेव्हलट कॅव्हुसोग्लू यांनीही अशीच कठोर भूमिका घेतली. पूर्व जेरुसलेम, वेस्ट बॅंक आणि गाझामधील संघर्ष वाढण्यास इस्रायल एकटाच जबाबदार आहे, असे कॅव्हुसोग्लू म्हणाले. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जरीफ यांनी इस्रायलवर नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्हा केल्याचा आरोप केला.

अरबी द्विपकल्प आणि पर्शियन आखातातील देशांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. बहारीन आणि सयुंक्‍त अरब अमिरातीने गेल्या वर्षी इस्रायलबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यांच्यासह सौदी अरेबियानेही पॅलेस्टाईनला पाठिंबा देऊ केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.