मुंबई – सुल्ली डील ऍपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. त्याची गंभीर दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्याचे आणि महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
सुल्ली डील नावाच्या ऍप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात आहेत. या सुल्ली डील ऍपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. तसेच असे ऍप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाला दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
सुल्ली डिलवर कारवाई करा : मलिक
सुल्ली डील नावाचे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर महिलांचे फोटो लावले जातात. तसेच त्यांची तिथे बोली लावली जाते. यामध्ये बहुतांश मुली या अल्पसंख्याक समजाच्या आहेत. काही चुका घडत असतील तर त्याबाबत आपले मत मांडणाऱ्या मुलीचे चारित्रहनन केले जात आहे. या घटनेची मी निंदा करत आहे. मी गृहमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. तसेच पोर्टल चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. महिलांचा लिलाव करण्यासाठी त्यांची माहिती पोर्टलवर टाकणे हा गुन्हा आहे, असे मलिक म्हणाले होते.