इस्लामाबाद – जग चुकीच्या दिशेने प्रवास करत आहे. जगाची वाटचाल शीतयुद्धाच्या दिशेने होत आहे. एकमेकांच्या प्रतिस्पर्धी गटांच्या राजकारणामुळे जगाचे नुकसान होणार आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम देशांच्या संघटनेने चीनबरोबर हातमिळवणी करायला पाहिजे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी देशांच्या संघटनेच्या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. इम्रान खान यांनी यावेळी मुस्लिम कल्याणकारी राज्याची संकल्पनाही मांडली. त्याशिवाय इस्लामोफोबिया आणि जागतिक राजकीय व्यवहारांबाबतही त्यांनी भाष्य केले.
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इस्लामी देशांच्या संघटनेच्या 48 व्या परिषदेला विविध इस्लामी देशांचे 600 प्रतिनिधी उपस्थित आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी हे देखील या परिषदेला उपस्थित आहेत.
युक्रेनचे युद्ध समाप्त करण्यासाठी करायच्या उपाय योजनांबाबत “ओआयसी’ने पुढाकार घ्यावा आणि त्या संदर्भाने चर्चा करावी, अशी सूचनाही इम्रान खान यांनी यावेळी केली.
“ओआयसी’ आणि चीनदरम्यान यापुढे सलोख्याचे संबंध कसे प्रस्थापित केले जाऊ शकतील आणि भागीदारी कशी निर्माण करता येऊ शकेल, यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार असल्याचेही इम्रान खान यांनी सांगितले.