केप टाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या संसदेला आज भयानक आग लागली. त्यामुळे संसदेचा संपूर्ण परिसर काळ्या धूराने वेढला गेला होता. राजधानी केप टाऊनच्या मध्यभागी असलेल्या संसदेच्या इमारतीला लागलेली ही आग विझवण्यासाठी फायर फायटरना खूप कष्ट घ्यावे लागले होते.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पहिल्यांदा ही आग लागली आणि त्यांनतर संसदेच्या मुख्य इमारतीपर्यंत आग पसरली. या इमारतीमध्येच दक्षिण आफ्रिकेचे संसदेचे सभागृह आहे, असे सार्वजनिक बांधकाम, पायाभूत सुविधा मंत्री पॅट्रिसिया डि लिली यांनी सांगितले.
ही आग नॅशनल असेंब्लीच्या चेंबरमध्ये पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लोकशाहीसाठी ही एक अत्यंत दुःखद घटना आहे, ही संसदेची इमारत म्हणजेच आमच्या लोकशाहीचे निवासस्थान आहे, अशा शब्दात डि लिली यांनी आपले दुःख व्यक्त केले.
या आगीमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याचे सुरक्षा रक्षकांना सर्वप्रथम सकाळी 6 वाजता लक्षात आले. त्यानंतर आग पसरू नये म्हणून तातडीने हालचाली करायला सुरुवात केली. मात्र आग संसदेच्या मुख्य इमारतीपर्यंत पोहोचली, असे केप टाऊन शहराचे आग आणि बचाव सेवेचे प्रवक्ते जेरमाईन कारेल्से यांनी सांगितले.
या आगीच्या घटनेबद्दल अध्यक्ष सिरील रामफोसा यांना कळवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डसमंड टुटू यांच्या पार्थिवावर शनिवारी झालेल्या अंत्यसंस्कारासाठी अध्यक्ष रामफोसा आणि अनेक वरिष्ठ पदाधिकारी केप टाऊनमध्येच आले आहेत. दुपारपर्यंत संसदेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर फायटरना यश आले असल्याचेही डि लिली यांनी सांगितले.
संसदेची इमारत कोसळण्याचा धोका…
संसदेची ही इमारत 1800 मध्ये बांधण्यात आली आहे. प्रचंड आगीमुळे जी उष्णता निर्माण झाली, त्यामुळे ही इमारत कोसणण्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. आगीमुळे छताला असलेले लोखंडी आवरण वितळायला लागले आहे. तर काही भिंतींनाही तडे जायला लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच ही संपूर्ण इमार कोसळण्याचा धोका निर्माण जाला आहे. इमारतीला आग लागल्यापासूनच या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी संसदेतील कर्मचाऱ्यांनाही इमारतीपासून दूर ठेवण्यात आले आहे.