नवी दिल्ली – इराकच्या उत्तरेकडील काही ठिकाणांवर इराणने आज क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ हा क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. हे ठिकाण म्हणजे इस्रायलच्या हेरगिरीचे केंद्र होते, असे इराणच्यावतीने सांगण्यात आले. याशिवाय सीरियामधील इस्लामिक स्टेटशी संबंधित काही ठिकाणांवरही क्षेपणास्त्रांचा मारा केला गेल्याचेही इराणने म्हटले आहे.
इराकमधील इरबिल शहरात झालेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामध्ये ४ लोक ठार झाले आणि ६ जण जखमी झाले. इरबिल या शहरामध्ये अर्ध स्वायत्त कुर्दिश बंडखोरांचा ताबा आहे, असे कुर्दिश प्रादेशिक सरकारने म्हटले आहे.
इराकमधून कार्यरत असलेल्या मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचे इराणमधील रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे. सीरियामधील इस्लामिक स्टेटशी संबंधित काही दहशतवादी ठिकाणांवर मारा करण्यात आल्याचेही इराणने एका अन्य निवेदनामध्ये म्हटले आहे.
इराणने केलेल्या या हल्ल्यांवर इस्रायलकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. तसेच अमरिकेला या संदर्भात करण्यात आलेल्या विचारणेवरही कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. इराकमध्ये इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचे मुख्यालय असल्याबद्दल देखील इस्रायलकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही.
इस्रायल आणि हमासमधील युद्धाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागल्याची चिन्हे इराणच्या या नव्या हल्ल्यांमुळे दिसायला लागली आहे.