नवी दिल्ली – भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा गूढ मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. जी दिनेश (वय २२ वर्षे) आणि निकेश (वय २१ वर्षे) अशी या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील दिनेश हा तेलंगणमधील वानापार्थी येथील असून निकेश हा आंध्रप्रदेशमधील श्रीकाकुरम येथील रहिवासी आहे. अमेरिकेत कनेक्टिकट येथे त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी ही माहिती दिली.
या दोघांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल दिनेश यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच त्याच्या रुममेटबद्दलचीही कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. जवळच राहणार् या दिनेशच्या मित्राने आपल्याला फोनवरून या घटनेबद्दलची माहिती दिली. या दोघांचाही मृत्यू कशामुळे झाला, हे आपल्याला माहिती नाही, असे दिनेशच्या कुटुंबीयांनी सांगितले.
दिनेश गेल्या वर्षी २८ डिसंबरला उच्च शिक्षणासाठी कनेक्टिकट येथे गेला होता. तर त्यानंतर काही दिवसांनी निकेश तेथे पोचला होता. त्यांच्यात काही समान मित्र होते. त्यामुळे दोघांमध्येही चांगली मैत्री झाली. अमेरिकेत गेल्यावर दोघेही एकाच खोलीमध्ये राहू लागले होते.
या दोघांच्या मृत्यूचा तपास आणि दोघांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी दिनेशच्या कुटुंबीयांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांची मदत मागितली आहे. वनापार्थीचे आमदार यांनीही मदतीसाठी केंद्रीय यंत्रणांशी चर्चा सुरू केली आहे. निकेशच्या कुटुंबीयांशी आपला काहीही संपर्क होऊ शकलेला नाही, असे दिनेशच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.