नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘खाकी – दी बिहार चॅप्टर’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. खऱ्या आयुष्यातील आयपीएस पोलीस अधिकारी अमित लोढा यांच्या जीवनामधील काही घटनांचा समावेश वेबसीरिजमध्ये कथेच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. मात्र, ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे अमित लोढा यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
अमित लोढा यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या वेबसीरिजच्या लोकप्रियतेवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोढा यांच्यावर त्यांच्या पदाचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अमित लोढा यांनी ‘द बिहार डायरीज’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांच्या करिअरमधील अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख आहे. यापैकी एका प्रकरणावर बेतलेली खाकी ही वेबसीरिज नुकतीच Netflix वर प्रदर्शित करण्यात आली आहे. एका मोस्ट वाँटेड गँगस्टरला बिहार पोलिसांनी कशा पद्धतीन पकडले, याची कथा या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अमित लोढांवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी असून आणि सरकारी नोकरीच्या पदावर असताना अमित लोढा यांनी Netflix शी आर्थिक व्यवहार केला. Friday Storytellers या प्रोडक्शन हाऊसशी डील केली. यातून त्यांना आर्थिक फायदा झाला. विभागांतर्गत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अमित लोढा यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याचंही विभगाकडून सांगण्यात आले आहे. या चौकशीच्या आधारावर ७ डिसेंबर रोजी अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.