#IPL2019 : मुंबईचा बंगळुरूवर दणदणीत विजय

मुंबई – गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव करत आगेकूच नोंदवली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 171 धावांची मजल मारत मुंबई समोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना मुंबईने हे लक्ष्य 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा करत पूर्ण केले. यावेळी पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी सात षटकांत 70 धावांची भागीदारी करत मुंबईला धमाकेदार सुरुवात करून दिल्यानंतर मोईन अलीने रोहितला बाद करत मुंबईला पहिला धक्‍का दिला. यानंतर दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करणाऱ्या डी कॉकलाही 40 धावांवर बाद करत अलीने मुंबईला दुसरा धक्‍का दिला.

ठरावीक अंतराने दोन धक्‍के बसल्याने मुंबईची धावगती थोडी मंदावली असताना आलेल्या इशान किशनने 9 चेंडूत 21 धावा करून मुंबईची धावगती वाढवली. किशन बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव देखील 29 धावावर परतला. तर कृणाल पांड्या11 धावावर बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत मुंबईचा विजय सुकर केला. यावेळी हार्दिकने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बंगळुरूची सुरुवात खराब झाली. विराट कोहलीला 8 धावा करून परतल्यानंतर आलेल्या ए. बी. डीव्हिलियर्सला साथीत घेत सलामीवीर पार्थिव पटेलने फटकेबाजी करत बंगळुरूला पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये 45 धावांची मजल मारून दिली. यानंतर पांड्याने ही जमलेली जोडी फोडली. यानंतर आलेल्या मोईन अलीला साथीत घेत डीव्हिलियर्सने बंगळुरूचा डाव सावरायला सुरुवात केली. दोघांनीही बंगळुरूला 10 षटकांत 2 बाद 70 धावांची मजल मारून दिली.

यानंतर दोघांनीही फटकेबाजी करत बंगळुरूला 13.2 षटकांत शंभरी गाठून दिली. यावेळी मोईन अली आणि डीव्हिलियर्सने आणखीनच फटकेबाजी करायला सुरुवात करत आपापली अर्धशतक पूर्ण केली.

मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यावर मोईन 50 धावावर बाद झाला. यानंतर डीव्हिलियर्स देखील 75 धावा करून परतल्यानंतर इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने बंगळुरूला 171 धावांचीच मजल मारता आली. यावेळी मुंबईकडून लसिथ मलिंगाने 31 धावा देत 4 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.