जयपूर -महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायडूने केलेल्या अर्धशतकी खेळीनंतर मिचेल सॅंटेनरने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला.
राजस्थानने 20 षटकांत 7 बाद 151 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेन वॉटसन, फाफ ड्यु प्लेसिस, केदार जाधव आणि सुरेश रैना स्वस्तात माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायडू यांनी सावध फलंदाजी करत चेन्नईची धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. यावेळी दोघांनी 95 धावांची भागीदारी करत चेन्नईला विजयाच्या जवळ पोहोचविले.
मात्र, 57 धावा करून रायडू परतल्यानंतर धोनीने फटकेबाजी करत चेन्नईला विजयाच्या समीप आणल्यानंतर 58 धावा करून तोही परतला. यावेळी अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना मिचेल सॅंटेनरने षटकार खेचत चेन्नईला 155 धावांची मजल मारून देत विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, राजस्थानच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर अनुक्रमे 14 आणि 23 धावा करून परतल्यानंतर संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी लवकर बाद झाले. यानंतर स्मिथ देखील 15 धावा करून परतल्याने राजस्थानची 5 बाद 78 अशी घसरगुंडी उडाली. बेन स्टोक्स आणि परागने राजस्थानचा डाव सावरला. मात्र, 16 धावांवर पराग बाद झाल्यावर स्टोक्सही 28 धावा करून परतला. यानंतर जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल यांनी 10 चेंडूत 25 धावांची भागीदारी करत राजस्थानला 151 धावांची मजल मारून दिली.