पुणे – पालिकाच्या निकृष्ट कामाचा आणखी एक नमुना

– हर्षद कटारिया

बिबवेवाडी – महर्षी नगर येथे लालबाग सोसायटी जवळ असलेल्या गार्डन लगतच्या रस्त्यावर पदपथावर छोटे सिमेंटचे नव्याने बसविण्यात आलेले काळे गट्टू (बोलार्ड) काही दिवसातच लगेच तुटून पडले आहेत.या गट्टू वरील प्लॅस्टिक कव्हर देखील निघाले नसताना ते तुटून पडले आहेत.त्यावरुन पालिकेच्या कामाचा दर्जा काय आहे याची जाणीव होते.अशा निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत विविध रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.हे सुशोभीकरण करताना सायकल ट्रॅक तसेच पादचाऱ्यांसाठी स्वंतत्र ट्रॅक तयार करण्यात येत आहे.या स्वतंत्र ट्रॅक वरुन इतर वाहने जावू नये म्हणून अडथळे म्हणून गट्टू उभारण्यात आले आहेत.महर्षीनगर येथील लालबाग सोसायटी भागात सुद्धा अशा प्रकारचे गट्टू उभारण्यात आले होते.सुशोभीकरण झाल्यामुळे रस्त्यांची शोभा वाढली होती,नागरिक सुद्धा पालिका प्रशासनाचे आभार मानत होते पण एक ते दोन दिवसात पालिकेच्या कामाचा पोल-खोल झाला आहे.हे गट्टू तुटून पडले आहेत.

फक्त आणि फक्त खर्च दाखविण्यासाठी आणि टेंडर मधील मलई साठी गरज नसताना अशा प्रकारचे हीन दर्जाचे गट्टू बसविण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी असून पदपथ फारच लहान आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन पडलेले हे गट्टू पाहताच हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे स्पष्ट होते. छोट्या अरुंद पदपथावर प्रत्येक बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावर हे गट्टू का बसविण्यात आले याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्याचबरोबर महर्षीनगर वसाहत पातळीवर अनेक मलवाहिन्यांची कामे अपुर्ण आहेत.त्याकडे सुद्धा प्रशासनाचे दुर्लेक्ष होत आहे.मलवाहिनीची कामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांच्या घरात मलवाहनीचे पाणी येत आहे.त्यामुळे या परिसरात नागरीक आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.नागरिकांना त्रास होणारी किंवा अडचणीची कामे प्रथम करण्यापेक्षा पालिका कर्मचारी पदपथ डांबरीकरण ब्लॉक बसविणे,अशा कामांवरच जास्त खर्च करत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे.

सर्व सामान्य नागरिक पालिकेला कर भरत असतो मात्र योग्य प्रकारे शासकीय कायदेशीर शिस्त नसल्याने व राजकीय वरदहस्त मुळे नागरिकांच्या पैशांची अशी उधळपट्टी होत आहे.प्रशासकीय अधिकारी असो किंवा राजकीय लोकप्रतिनिधी कोणीही चुकीच्या कामांची नैतिक जबाबदारी घेण्यास किंवा खरी माहिती देण्यास तयार नाही.हे खर दु:ख आहे असे ही नागरिक स्पष्ट करतात.

महर्षी नगर परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण व पदपथांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून लालबाग सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पदपथावर जे गट्टू बसविण्यात आले आहेत हे काम म्हणजे कहरच आहे प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी असून सदर गट्टू इतके निकृष्ट आणि हीन दर्जाचे आहेत की सिंमेंटचे आहेत की मातीचे हे समजतच नाही.

– राजेश बेल्हेकर, माहिती अधिकार कार्यकर्ता.

महर्षी नगर येथे सदर रस्त्यावर पदपथावर काळ्या रंगाच्या लहान गट्टू बसविण्याचे काम माझ्या निधीतून नसून इतर नगरसेवकाचे आहे सदर बाबत योग्य माहिती घेऊन संबंधितांना चांगले काम करण्यास सांगितले जाईल.

– राजश्री शिळीमकर, नगरसेविका.


या रस्त्यावरील पदपथावर काळ्या रंगाचे लहान गट्टू बसविण्याचे काम हे मुख्य खात्या कडून केलेले असावे, मला खरी माहिती काय आहे हे माहीत नाही. संबंधित कामाबाबत नक्की माहिती घेऊन कळविण्यात येईल.
– अजय खामकर, कनिष्ठ अभियंता बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.