मुंबई – जगभरात क्रिकेटचा प्रसार करण्याचे धोरण बीसीसीआयने आखले आहे. त्याच अंतर्गत आता येत्या काही वर्षांत अमेरिकेतही या स्पर्धेचे आयोजन करण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्या अमेरिकेतील क्रिकेट वाढत आहे, त्यातच तेथील स्थानिक सामन्यांना तसेच स्पर्धांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हेच पाहता येत्या काही वर्षांत अमेरिकेतील मैदानांवर आयपीएलचे सामने पाहायला मिळाले तर स्पर्धेच्या व्याप्तीसाठी ते चांगलेच होणार आहे, असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.
आयसीसीच्या सहयोगी देशांमध्ये अमेरिकेतच सध्या क्रिकेटची प्रगती होत आहे. भारतीय वंशाचे अमेरिकेत स्थायिक झालेले लोकच तेथील क्रिकेटचे आयोजन करत आहेत, त्यामुळे त्यांच्या देशात ही स्पर्धा घेणे खूपच महत्त्वाचे ठरेल व येत्या काळात तेथेही स्टार खेळाडू तयार होताना दिसतील, असा विश्वासही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.