List Of Players Who Featured Since IPL 2008 To IPL 2024 : आयपीएल स्पर्धा दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होते. दरवर्षी साधारण दीड महिना ही स्पर्धा चालते. आयपीएलआधी आणि आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय कॅलेंडर अतिव्यग्र स्वरुपाचं असतं. आयपीएल खेळायचं आहे म्हणून आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणाला मूभा मिळत नाही. सलग 16 हंगाम खेळण्यासाठी खेळात प्रचंड सातत्य हवं. खेळाडू अतिशय फिट हवा.
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून या स्पर्धेचे 16 हंगाम झाले आहेत. एखाद्या स्पर्धेत सलग 16 वर्षं खेळणं हे अनेकदृष्ट्या अनोखं आहे. पहिल्या सत्रात खेळलेले बहुतेक खेळाडू निवृत्त झाले आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का, की असे अनेक खेळाडू आहेत जे पहिल्या सत्रापासून खेळत आहेत.
महेंद्रसिंग धोनीशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या मोठ्या नावांचा या यादीत समावेश आहे. या खेळाडूंनी सर्व 16 हंगामात किमान 1 सामना खेळला आहे. त्याचवेळी, आता हे क्रिकेटपटू 17 व्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत.
1. महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. सीएसकेने त्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती, परंतु शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत राहिला. तथापि, तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून 2 हंगाम खेळला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
2. विराट कोहली
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत असलेल्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश आहे. विराट कोहली आयपीएल 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 237 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 130.02 च्या स्ट्राइक रेटने आणि 37.25 च्या सरासरीने 7 हजार 263 धावा केल्या आहेत.
3. दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक आयपीएल 2008 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता. तेव्हापासून तो सलग 16 हंगाम वेगवेगळ्या संघांसाठी खेळला आहे. आत्तापर्यंत पंजाब व्यतिरिक्त दिनेश कार्तिक दिल्ली, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. दिनेश कार्तिकच्या नावावर 242 आयपीएल सामन्यात 4 हजार 516 धावा आहेत.
4. शिखर धवन
शिखर धवन IPL 2008 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनला. शिखर धवन मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबादकडून खेळला आहे. सध्या तो पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. IPL च्या 217 सामन्यांमध्ये शिखर धवनने 127.16 च्या स्ट्राईक रेटने आणि 35.19 च्या सरासरीने 6 हजार 616 धावा केल्या आहेत.
5. रोहित शर्मा
रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्या मोसमात तो डेक्कन चार्जर्स हैदराबादचा भाग होता. यानंतर रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग बनला. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याच वेळी, रोहित शर्माने 243 आयपीएल सामन्यांमध्ये 130.05 च्या स्ट्राइक रेट आणि 29.58 च्या सरासरीने 6 हजार 211 धावा केल्या आहेत.