Sangharsh Yoddha Movie । Mohan Joshi : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन मराठ्यांच्या नेतृत्वासाठी झंझावात बनून तेवत राहणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाची गाथा.. अशा कॅप्शनखाली चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला हा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. | Sangharsh Yoddha Movie । Mohan Joshi
या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील बराचसा भाग खऱ्याखुऱ्या आंदोलनादरम्यान शूट करण्यात आल्याचे टीजरवरून समजते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.
तर मनोज जरांगे यांच्या वडिलांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी साकारली आहे. मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
यासह अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा दमदार अभिनेत्यांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. | Sangharsh Yoddha