Shalini Patil । मविआघात सांगली लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी मविआ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मविआत कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. सांगलीतून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील प्रयत्न करत होते. मात्र काँग्रेस नेतृत्वाने सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या विचारांत असल्याचे बोलले जातंय.
मी विशाल पाटलांबाबत काही बोलले नाही Shalini Patil ।
दरम्यान, विशाल पाटील यांच्या आजींनी म्हणजेच दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी नातवाचे कान टोचलेत. शालिनी पाटील यांनी ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्या म्हणाल्या, मला वाटतं चंद्रहार पाटील निवडून येऊ शकतात. मात्र मी विशाल पाटलांबाबत काही बोलले नाही.
उमेदवारी मिळायला आता फार उशीर झाला Shalini Patil ।
चंद्रहार पाटील योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं. राहिला विषय विशाल पाटलांच्या उमेदवारीचा तर त्याला आता उशीर झाला आहे. तो विषय आता फार पुढे गेला आहे. निवडणूक आता मतदानाच्या टप्प्यात आलीय. चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निर्णयाला महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनीदेखील मान्यता दिली आहे. दिल्लीचं नेतृत्वदेखील याबाबत फेरविचार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे उमेदवारी मिळायला आता फार उशीर झाला आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही केवळ कोणाचेतरी नातेवाईक असणं पुरेसं नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच वर्षे काम केलेलं असायला हवं. पाच वर्षे लोकांशी संपर्क ठेवायला हवा. लोकांची कामं करून तुम्ही निवडणुकीच्या काळात लोकांसमोर गेलात, तुमच्या कामांद्वारे पुढे आलात तर लोकांचं तुमच्याबद्दल चांगलं मत तयार होतं. लोकांचं तुमच्याबद्दल चांगलं मत तयार झाल्यानंतर तुम्ही काँग्रेसकडे तिकीट मागायला हवं. अशा वेळी पक्षदेखील तुमच्याबद्दल विचार करतो. पाच वर्षे काम करा आणि पक्षाने तिकीट दिलं तर निवडणुकीला उभे राहा. अपक्ष निवडणूक लढण्यात काही अर्थ नाही.