ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळू लागला असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवजातीच्या हातामध्ये फक्त दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. असा इशारा युनायटेड नेशनच्या एका पर्यावरण विषयक तज्ज्ञाने दिल्याने जगातील सर्वच देशांना त्याची दखल घ्यावी लागणार आहे.
युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज या संस्थेचे कार्यकारी सचिव सायमन स्टोइल यांनी पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्यासाठी जगातील सर्वच देशांना विशिष्ट वित्तव्यवस्था उभारावी लागणार असून हा मोठा बदल घडवण्यासाठी खूपच कमी वेळ हातामध्ये असल्याचा इशारा दिला आहे. यूनोसारख्या प्रमुख संघटनेने हा इशारा दिला असल्यामुळे यूनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. खरे तर ग्लोबल वॉर्मिंग हा विषय तसा नवा नाही. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. पृथ्वीचे तापमान सतत वाढत असल्यामुळे ज्या विविध समस्या निर्माण होताना दिसत आहेत त्या समोर दिसत असूनही याबाबत काही भरीव करावे असे कोणालाच वाटत नाही याचेच दुःख आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वच देशांमध्ये कार्बन वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2025 पर्यंतच सर्व देशांना मुदत आहे, अशी डेडलाइनही सायमन स्टोइल यांनी दिली असल्याने या डेडलाइनचा विचार करून तरी जगातील सर्वच देश त्या दिशेने एकत्रितपणे प्रयत्न करतील अशी आशा करावी लागेल. भारतात सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंड यासारख्या अनेक मोठ्या देशांमध्ये येत्या काही कालावधीमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी आपले पर्यावरण विषयक धोरण ठरवण्याची हीच वेळ आहे. जागतिक स्तरावर यूनोसारख्या व्यासपीठावर जे प्रमुख देश नेहमी निर्णय घेत असतात त्या देशांनीच या दिशेने काहीतरी करण्याची गरज आहे.
जगातील एक प्रमुख महासत्ता असलेल्या अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरामध्ये पुढील महिन्यामध्ये जागतिक वित्तीय संस्थांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पृथ्वीचे पर्यावरण संतुलन बिघडू नये यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी वित्तीय नियोजन काय करता येईल याचीही चर्चा होणार आहे. पण यासाठी या सर्व वित्तीय संस्थांवर प्रभाव असलेल्या अमेरिका, रशिया, भारत, चीन, जपान, जर्मनी यासारख्या देशांनी पुढाकार घेतला तरच ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोका कमी करण्याबाबत काहीतरी भरीव काम मार्गी लागेल. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द केवळ व्यासपीठ गाजवण्यासाठी किंवा जागतिक परिषदांमध्ये पेपर सादर करून गाजवण्याचा विषय नाही.
गेल्या काही कालावधीमध्ये ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे ते पाहता नजीकच्या कालावधीमध्ये त्यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर नंतर ही सर्व प्रक्रिया मानवी नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगचा एक परिणाम म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गचक्र संपूर्णपणे बदलून गेले आहे. पाऊसमान कमी झाले आहे. ज्या काळात पाऊस पडायला हवा त्या काळात पाऊस न पडता अवकाळी पद्धतीने पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा उपयोग न होता उलट त्याचा त्रासच होताना दिसत आहे. या व्यतिरिक्त उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतूही अत्यंत तीव्र होऊ लागले आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा फटका हा शेती क्षेत्राला बसतो. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने आणि पावसाचे वेळापत्रकही बदलत असल्यामुळे शेतीला आवश्यक असते तेव्हाच पावसाचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे कडक उन्हामध्ये पिके वाळून जातात. जगाच्या पाठीवर राहणार्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी जेवढी अन्नधान्याची निर्मिती करण्याची गरज आहे तेवढी निर्मिती नजीकच्या कालावधीमध्ये होईल की नाही याविषयी शंका आतापासूनच निर्माण होऊ लागली आहे. तीच परिस्थिती पाण्याची आहे. ज्या प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगातील सर्वच देशांना पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे त्यावरून आत्ताच काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. दोन वर्षांनंतर पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणीही काहीही करू शकणार नाही, असाच स्पष्ट इशारा देण्यात आला असल्याने सर्वांनीच यासाठी एखादी धोरण निश्चिती करण्याची गरज आहे.
यूनोमधील बहुतेक सगळ्या संस्थांवर अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी यासारख्या देशांचा प्रभाव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचाही यूनोवरील प्रभाव वाढला आहे. या सर्व प्रभावशाली देशांनीच आपली जबाबदारी ओळखून एखाद्या कॉमन अशा धोरणाची निश्चिती करण्याची गरज आहे. खरे तर काही वर्षांपूर्वी भारतासह जगातील सर्वच प्रमुख देशांनी चिरंतन विकासाच्या तत्त्वाचा स्वीकार केला होता. म्हणजेच आधुनिक कालावधीमध्ये विकास करत असताना भावी पिढीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही अशा प्रकारेच विकासाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सर्वच देशांनी जरी घेतला असला तरी तो प्रत्यक्षात अंमलात आला नाही. म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंगची तीव्रता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते अद्यापही काही बिघडलेले नाही आणि आताच जर आपण जागे झालो आणि वेळीच सर्व काही ठीक केले तर पृथ्वीच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये यूनोच्या पुढाकाराने अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये चांगले निर्णय झाले होते. त्याचप्रमाणे आता पर्यावरणाचा समतोल ढासळू नये आणि पृथ्वीचे तापमान अधिक वाढू नये यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित होत आहे. मानवजातीचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर ग्लोबल वॉर्मिंगचा हा इशारा दुर्लक्षित करून चालणार नाही.