IPL 2024 (MI vs RCB Match 25,Glenn Maxwell ) : आयपीएल 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला आहे. आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा हा दुसरा विजय आहे.
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2024 मध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये झुंजत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघणे कठीण झाले आहे. आयपीएल 2024 मध्ये तो अद्याप मोठी खेळी खेळू शकलेला नाही. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध चार चेंडू खेळले, पण त्याला खातेही उघडता आले नाही. यासह मॅक्सवेलच्या नावावर एका लाजिरवाण्या (नको असलेला) विक्रमाची नोंद झाली आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल हे आयपीएलमध्ये 17-17 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
विशेष म्हणजे कमी सामने खेळताना मॅक्सवेल हा 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. नियमांनुसार, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 130* सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, तो 17 वेळा खाते न उघडता माघारी परतला आहे . कार्तिक आणि रोहित शर्मा यांना अनुक्रमे 248*-248* सामन्यांमध्ये 17-17 वेळा भोपळाही फोडता आलेला नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंची यादी :
1. ग्लेन मॅक्सवेल : 17 वेळा
2. दिनेश कार्तिक : 17 वेळा
3. रोहित शर्मा : 17 वेळा
4. राशिद खान : 15 वेळा
5. पियुष चावला : 15 वेळा
6. मनदीप सिंग : 15 वेळा
7. सुनील नरेन : 15 वेळा
8. मनीष पांडे : 14 वेळा
9. अंबाती रायुडू : 14 वेळा
10. हरभजन सिंग : 13 वेळा
वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ग्लेन मॅक्सवेलच्या चांगल्या खेळीची गरज होती, पण तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईचा फिरकीपटू श्रेयस गोपालने मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गोपालने त्याला पायचीत केले.
दरम्यान, आय़पीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेलची बॅट त्याच्यावर पूर्णपणे रागावली आहे. त्याच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याने आतापर्यंत आरसीबीसाठी एकूण 6 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 6 डावात 5.33 च्या सरासरीने केवळ 32 धावा झाल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 94.11 राहिला आहे. ऑरेंज कॅप यादीत मॅक्सवेल सध्या 74 व्या क्रमांकावर आहे.