Gujarat Titans vs Delhi Capitals, Match 32 : आयपीएल 2024 चा 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरातने या मोसमात 6 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. दिल्लीने 6 सामने खेळले असून 2 जिंकले आहेत. गुजरात टायटन्ससाठी या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि रशीद खान गेम चेंजर ठरू शकतात.
Shubman Gill : गिल या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शुभमनने या मोसमात आतापर्यंत 6 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 255 धावा केल्या आहेत. गिलने 2 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 7 धावांची इनिंग खेळली होती तर गिलने पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद 89 धावा केल्या होत्या. दिल्लीविरुद्धही तो चांगली कामगिरी करू शकतो. गिलची बॅट चालली तर गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गुजरातचा संघ घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. त्याचा फायदा त्याला मिळू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे गिलचा इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्याविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. हे तिन्ही गोलंदाज दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र गिलविरुद्ध त्यांना विशेष काही करता आलेले नाही.
Rashid Khan : रशीद खान फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही चांगला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राशिदने नाबाद 24 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने अवघ्या 18 धावांत 1 बळीही घेतला. या सामन्याशिवाय या मोसमात इतर कोणत्याही सामन्यात रशीदला बॅटने विशेष काही करता आलेले नाही. मात्र त्याला दिल्लीविरुद्ध संधी मिळाल्यास तो गुजरातसाठी गेम चेंजर ठरू शकतो. राशिदने या मोसमात 6 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 49 धावांत 2 बळी.
GT vs DC : Head to Head Records…
आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने दोन सामने जिंकले असून दिल्लीने एक सामना जिंकला आहे.
दरम्यान, गुणतालिकेत गुजरात टायटन्स 6 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि दिल्ली कॅपिटल्स 6 सामन्यांतून दोन विजय आणि 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. अशा परिस्थीतीमध्ये लीगमध्ये पुनरागमन करण्याच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही संघांमध्ये आजच्या सामन्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते.