पाटणा – लोकसभा निवडणुकीच्या तिकिटवाटपात गडबड झाल्याचा आरोप करणारे राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव यांनी राजदच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या धोरणांशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. (Bihar Politics: RJD National Vice President resigns, big blow to Lalu Yadav amid elections!)
राज आणि निती यांच्यात सामंजस्य असण्याची आवश्यकता आहे. तत्व नसलेले राजकारण म्हणजे आत्मा नसलेले शरिर आहे असेही देवेंद्र प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. राजदने झंझारपूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे बंडखोर माजी आमदार सुमन महासेठ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच देवेंद्र प्रसाद पक्षावर नाराज होते.
झंझारपुर येथून कोणत्या समाजवादी विचारधारेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली असती तर त्याचा सहज विजय झाला असता. केवळ झंझारपुरच नाही तर अन्य सहा सात जागांवर उमेदवार आयात केले गेले आहेत. या सगळ्याच जागांवर राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांना उमेदवार केले गेले असते तर आपली कोणतीही तक्रार राहीली नसती असे देवेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना डावलून जातीयवादी विचारसरणी असणाऱ्यांना उमेदवारी देणे हे माझ्या मनाला न पटण्यासारखे आहे व पक्षात क्षणभरही थांबण्याची माझी इच्छा नाही. झंझारपुर येथून पाच वेळा खासदार राहीलेले यादव पुढे म्हणतात की झंझारपुर ही समाजवाद्यांची भूमी आहे व तिला जातीयवाद्यांकडे गहाण टाकण्यात आले आहे. माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या झंझारपुरशी मी असे कपट करू शकत नाही.