Abhijit Bichukale | Lok Sabha Election 2024 : कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा बिग बॉस फेम बिचकुले चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.
यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा लोकसभा, विधानसभेची निवडणूक असेल यामध्येही त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलं आहे. ‘हरण्याची मला खंत नाही…’ असं म्हणत अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात. यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. । Abhijit Bichukale | Lok Sabha Election 2024
साताऱ्यातून अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अभिजित बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही बिचुकलेंनी दिला.
या लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगत बिचुकलेने रणशिंग फुंकले. मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिलला अर्ज भरणार असल्याची घोषणा बिचुकलेंनी केली.
अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजेंवर टीका केली. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे असे आवाहन बिचुकलेंनी केले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी मी केली होती. समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.पण, स्मारकाची एक विटही रचली नसल्याची टीका बिचुकलेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा असे आवाहन बिचुकलेंनी केले.