मुंबई – सलामीवीर कॅमेरुन ग्रीनचे नाबाद शतक, रोहित शर्माने केलेली अर्धशतकी खेळी व सूर्यकुमार यादवची आक्रमक फटकेबाजी यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. हादराबादने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर ईशान किशनने आक्रमक सुरुवात केली. मात्र, याच वेगावेन फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कॅमेरुन ग्रीनसह संघाचा डाव सावरताना संयमी खेळी केली.
यंदाच्या स्पर्धेत दुसरे अर्धशतक साकार करताना त्याने ग्रीनच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची भक्कम भागीदारी केली व विजयाचा पाया रचला. अर्धशतक पूर्ण झाल्यावर रोहित लगेचच परतला. त्याने 37 चेंडूत 8 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. ग्रीननेही आपले अर्धशतक पूर्ण करत वादळी फलंदाजी केली. त्याला साथ देत सूर्यकुमार यादवने संघाचे दीडशतक फलकावर लावले.
ग्रीन मनमुराद फटकेबाजी करत होता. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची अखंडीत भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. ग्रीनने अफलातून फटकेबाजी करत आपले शतक साकार केले. त्याने नाबाद 100 धावांच्या खेळीत 47 चेंडूत 8 चौकार व 8 षटकारांची बरसात केली. सूर्यकुमार 16 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावांवर नाबाद राहिला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचे सलामीवीर मयंक आग्रवाल व विव्रांत शर्मा यांनी वादळी सुरुवात केली. या जोडीने मुंबईची गोलंदाजी फोटून काढताना पॉवरप्लेचा पुरेपुर वापर करुन घेतला.
या जोडीने 14 व्या षटकातच 140 धावांची भक्कम सलामी दिली. विव्रांत व मयंक या दोघांनीही आपापली अर्धशतके साकार केली. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 47 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारांसह 69 धावा करुन बाद झाला. मयंक मात्र, शतकाकडे कूच करत होता, त्याचवेळी आततायी फटका मारण्याच्या प्रयत्नात तो 83 धावांवर परतला.
त्याने या खेळीत 47 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 4 षटकार फटकावले. यानंतर मात्र, त्यांचा डाव घसरला. तळात हेनरीच क्लासनने 18 तर कर्णधार एडन मार्करमने नाबाद 13 धावांची खेळी करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. मुंबईकडून आकाश मधवालने सर्वाधिक 4 गडी बाद केले.