कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणात कर्नाटकातील संशयित आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने सुनावणी 9 जूनपर्यत लांबणीवर पडली आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.तांबे यांच्यासमोर पानसरे खटल्यातील सुनावणी सुरु आहे. कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला. त्यामुळे कर्नाटकात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक होता. त्यामुळे संबंधित संशयित आरोपींना बंदोबस्तात कोल्हापुरातील न्यायालयात हजर ठेवणे अशक्य होते. परिणामी ते हजर राहिले नाहीत, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत गोविंद पानसरे यांचा एक्सरे व इतर वैद्यकीय कादगपत्रांचा 124 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली. सरकारी पक्षाकडून ड.शिवाजी राणे यांनी युक्तिवाद केला होता. आरोपींच्या बाजूने सात वकिलांनी आपले म्हणणे मांडले.
दरम्यान, 20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पानसरे, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा आरोप असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.