नवी दिल्ली – करोना विषाणूंचा धोका ऑलिम्पिकला बसण्याची शक्यता असतानाच आयपीएलवरही त्याचे सावट निर्माण झाले आहे. भारतातही करोनाचे काही रुग्ण आढळले असून याबाबत सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
मंडळाचे सदस्य व आयपीएल व्यवस्थापन समितीचे सदस्य ब्रिजेश पटेल यांनी स्पर्धेला करोनाचा धोका नसल्याचे व्यक्त केले असले तरी खेळाडूंना जागृत केले जाईल असे सांगण्यात आले आहे. स्पर्धेची सलामी लढत येत्या 29 मार्चला मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
दरम्यान, करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्वाच्या मानल्या जात असलेल्या जर्मन ओपन आणि पोलंड ओपन या बॅडमिंटन स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही महिन्यात या विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाला नाही तर, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीही शक्यता आहे.