नवी दिल्ली – ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या जवजवळ प्रत्येक हंगामात काही ना काही लहान-मोठे बदल पाहण्यास मिळाले आहेत. जगातील सर्वात चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग 2008 मध्ये सुरु झाली. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या आयपीएलमध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभाग होत असतात. आणि ते त्यांच्या खेळाने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करतात.
पण अशातच भारतामध्ये पुन्हा एकदा करोना महामारीने डोके वर काढलेय. आज देशभरात जवळपास सहा हजार नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. प्रत्येक आठव्याला करोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असून, याचा परिणाम आता आयपीएल स्पर्धेवरही दिसू लागला आहे. नुकतंच, भारताचे माजी कसोटीपटू व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही करोनाचे सावट निर्माण झाले आहे. स्वतः चोप्रा यांनीच आपल्याला करोनाची बाधा झाल्याचे ट्विट केले आहे.
दरम्यान, आता करोनाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला बीसीसीआयने खेळाडूंना दिला आहे.
तसेच, आपल्या सोबत इतर खेळाडूंची देखील काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य प्राथमिक जबाबदारी आहे. सरकारकडून जी नियमावली येईल, त्याचे पालन केले जाईल, असेही बीसीसीआयने म्हंटल आहे.