जगात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करतो. काही लोक चवीसाठी वेगवेगळे प्रयोग करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की मासे खाल्ल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो? होय, असेच एक अनोखे प्रकरण मलेशियातून समोर आले आहे. मलेशियामध्ये 83 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचे पती आयसीयूमध्ये गेले. गेल्या आठवड्यात या जोडप्याने ‘पफर फिश’ खाल्ल्याचे सांगितले जात आहे. या माशात अतिशय विषारी पदार्थ असल्याचे म्हटले जाते. चला तर, जाणून घेऊया, नेमकं काय घडलं.
* पफर माशात असतात विषारी पदार्थ
न्यूयॉर्क पोस्टने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पफर या माशात विषारी पदार्थ असतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर महिला आजारी पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच या महिलेचा मृत्यू झाला.
* जेवताना महिला थरथरू लागली
या दंपतीची मुलगी एनजी एली हिने घटना अशी सांगितली की तिच्या वडिलांनी 25 मार्च रोजी जवळच्या दुकानातून पफर फिश विकत घेतले होते. यानंतर दोघांनी जेवणात हे मासे खाल्ले. जेवताना तिची आई अचानक थरथरू लागली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
* अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू
एनजीने स्पष्ट केले की वडिलांनी जाणूनबुजून इतका प्राणघातक मासा खाण्यासाठी विकत घेतला नाही. आई आजारी पडल्यानंतर काही तासांनी वडिलांनाही तीच लक्षणे दिसू लागली. जोहोरच्या आरोग्य आणि एकीकरण समितीचे अध्यक्ष, तियान सून यांनी सांगितले की, मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी सांगितले की पफर फिशमध्ये घातक विष आढळते.
* वडील अजूनही कोमात
दाम्पत्याच्या मुलीने सांगितले की तिचे वडील अजूनही कोमात आहेत. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. यासोबतच डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांचे वय खूप जास्त आहे, त्यामुळे बरे होऊनही ते पूर्वीसारखे राहणार नाहीत.
* का आहे हा मासा जीवघेणा ?
पफर फिशबाबत डॉक्टर म्हणतात की त्यात टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन असते, जे थंड करून किंवा गरम करूनही बाहेर काढता येत नाही. केवळ कुशल शेफ ते तयार करतात. ते आपल्या कौशल्याने त्यातील घातक विष काढून टाकण्यास सक्षम असतात. सामान्य लोक हे मासे विकत घेणे टाळतात.