बंगळुरू -कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप याने घेतलेल्या निर्णयाने ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज चकित झाले आहेत. सुदीपच्या कृतीमुळे मला धक्का बसला. तसेच, मी व्यथितही झालो, असे त्यांनी म्हटले आहे. सुदीप याने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
मात्र, तशी शक्यता राज यांनी फेटाळली होती. सुदीप हा अतिशय सुज्ञ नागरिक आहे. तो जाळ्यात अडकणार नाही. कर्नाटकात पराभवाच्या शक्यतेने धास्तावलेल्या, अस्वस्थ असलेल्या भाजपने बनावट बातमी पसरवली असावी असे वाटते, अशी प्रतिक्रियाही राज यांनी दिली होती. मात्र, सुदीपने बोम्मई यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ते चक्रावले.
सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करण्यासाठी राज ओळखले जातात. अनेकदा मोदी सरकारवरही त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या (2019) रिंगणातही ते उतरले होते. त्यांनी बंगळुरूमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण, त्यांच्या पदरी अपयश आले.