पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एका अल्पवयीन मुलाने केवळ मौजमजेसाठी १५ दिवसांत तब्बल १० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरला. वाहने चालवण्याची हौस फिटल्यानंतर ती रस्त्याकडेला सोडून दिली. त्याने हिंजवडी, वारजे माळवाडी, भारती विद्यापीठ, पर्वती, अलंकार आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही वाहने चोरली होती. वारजे पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली, त्याच्या ताब्यातून ५ लाख १५ हजाराची वाहने हस्तगत करण्यात आली.
वारजे पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी गस्त घालत असतान खानमज्जीद जवळ एका स्टनर दुचाकीवर एक मुलगा संशयास्पदरित्या थांबलेला दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी वारजे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते आणि उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांनी त्याची सखोल चौकशी केली असताना दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. मुलगा अल्पवयीन असल्याने पालकांना बोलावून घेण्यात आले. तेव्हा त्याच्या ताब्यातून १० दुचाकी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रामेश्वर पारवे करत आहेत.
ट्रॅक्टरही चालवून बघायचा होता…
अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे निधन झाले असून त्याची आई दोन मुलींना घेऊन घर सोडून गेली आहे. तो सध्या मावशीकडे रहातो. त्याला दुचाकींचे मोठे आकर्षण होते. मात्र, ऐपत नसल्याने तो बनावट चावीने दुचाकी चोरु लागला. दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर तो ती रस्त्याच्याकडेला सोडून देत होता.
दरम्यान त्याला ट्रॅक्टरही चालवून बघायची हुक्की आली. वडगावच्या पुलाखाली असलेल्या एका शेतात, त्याला ट्रॅक्टर दिसला. त्याने तो चालू करुन कसाबसा चोरुन नेला. इंधन संपल्यावर तोही रस्त्यात सोडून दिला.
ही कारवाई उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भिमराव टेळे भिमराव टेळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे , पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांनी केली आहे.