दुर्दैवी घटना घडल्यास एक कोटीचे कवच – उपमहापौर हिंगे
पिंपरी – संपूर्ण देशामध्ये करोना आजाराने धैमान घातले आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय जीवाची बाजी लावून या लढाईमध्ये देशसेवा करत आहेत. महापालिकेच्या वतीने असे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आता महापालिकेच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांनीही या निर्णयाला मंजूरी दिली. बैठकीस महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमन्यू भोसले उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादा डॉक्टर अथवा कर्मचारी यांचा करोना विषाणूने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये व वारसास मनपामध्ये नोकरी दिली जाणार आहे. मात्र यामधून कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. मात्र आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 50 लाख रुपये, महापालिकेच्या वतीने 25 लाख देण्यात येणार आहेत. तसेच वारसाला नोकरी देण्यात येणार आहे. जर वारसाला नोकरी नको असले तर पालिका पन्नास लाख रुपये असे एकूण 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण देणार असल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच “कवच’
रुग्णालयातील अपघात विभागापासून ते मेडीसीन, स्त्रीरोग तज्ज्ञ अशा सर्वच विभागात हे अस्थायी डॉक्टर व परिचारिका कायर्रत आहेत. रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या संशयितांचे नुमने घेणे, ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविणे, त्यांचे अहवाल घेणे, त्याची माहिती महापालिकेला देणे अशी कामे हे डॉक्टर करत असतात. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे करोनाग्रस्तांवर उपचार करणे, त्यांची देखभाल करणे अशा सर्वच पातळीवर काम करावे लागत आहे. त्यांना विमा संरक्षण मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.