पुणे – शहरात करोना बाधित रुग्ण वाढत असले तरी अनेकजण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे ज्या कुटुंबात एखादी व्यक्ती करोना बाधित आढळत आहे. त्या व्यक्तीचे सगळेच कुटुंब महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन केले जात आहे. तसेच, त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास या कुटुंबाला हातावर शिक्के मारून घरी सोडण्यात येत आहे. तसेच त्यांना घराबाहेर पडण्यास मनाई केली जात असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
शहरात गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. प्रामुख्याने दाट वस्तीच्या भागात हे रुग्ण आढळत आहेत. या भागांत संपूर्ण कुटुंबच एका खोलीत रहात असल्याने करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले सगळे कुटुंबच करोना बाधित होत असल्याचे सुमारे 15 ते 18 प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या कुटुंबाकडून पुन्हा नव्याने इतरांना संसर्ग वाढू नये म्हणून सगळे कुटुंबच महापालिकेकडून निश्चित केलेल्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन केले जात आहे. तर या कुटुंबाचे अहवाल येईपर्यंत त्यांना इथेच ठेवले जात आहे.
याशिवाय, या व्यक्तीमधील एखाद्या व्यक्तीस इतर काही आजार असल्यास त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. पालिकेकडून सध्या या संस्थात्मक क्वारंटाइनसाठी 2 ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अंगावर आजार न काढण्याचे आवाहन
ज्या कुटुंबात करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या कुटुंबामध्ये करोना सदृश लक्षणे असताना अंगावर आजारपण काढले जात आहे. त्यामुळे वेळीच उपचार न घेतल्याने तसेच दुर्लक्ष केल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन घरातील एखाद्या व्यक्तीला करोना सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू रुग्णालयात तपासणीसाठी यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केले आहे.