पुणे -पुणे शहरातील निम्याहून अधिक भाग सील केलेले असताना आता शहरालगत असणाऱ्या काही गावांनासुद्धा सील करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. यात हवेली तालुक्यातील वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदे, खडकवासला, किरकिटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या गावांचा समावेश आहे. ही गावे आता गुरुवारी (दि. 16) पूर्णपणे बंद करण्यात आले असून याबाबतचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना सुद्धा देण्यात आले आहेत.
पुणे शहरात सध्या करोनाचे नवीन रूग्ण सतत वाढत आहेत. त्याचबरोबर पुणे शहराच्या लगत असणाऱ्या गावांना सुद्धा त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे हवेलीचे तहसीलदार सचिन बारवकर यांनी सांगितले.
या आदेशानूसार या आदेशानूसार मध्यरात्रीपासून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर अगदी आवश्यक किंवा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यानूसार बाहेर पडल्यावर प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे.