“घडले बिघडले, वंदे मातरम नाटकात भूमिका : खासदार सुळेंकडून कलादालनास भेट
बारामती- खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील नटराज नाट्य मंदिराच्या कलादालनास भेट दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाटकात केलेल्या दुर्मिळ तैलचित्राची पाहणी त्यांनी केली.
कलादालनाबाबत सुळे यांना गुजर यांनी माहिती दिली. गुजर म्हणाले, या दालनात कालची, आजची आणि उद्याची बारामती कलादालनात साकारण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये आढळलेल्या शिलालेखांच्या प्रतिकृती येथे उभारण्यात येतील. बारामतीचे त्या काळी असणाजया नाण्याचे संदर्भ इंग्लंड येथील पुस्तकात मिळाले आहेत. त्या नाण्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. इंग्लंडमध्ये वास्तव्यस असणाऱ्या पुतणे करण गुजर यांच्याकडून याबाबत माहिती मिळाली.
कलादालनाच्या माध्यमातून नागरिकांना तीन शतकातील स्थित्यंतरे पाहता येणार आहेत. पहिल्या भागात शंभर वर्षापूर्वीच्या बारामतीची छायाचित्रे, पेंटीग्जच्या माध्यमातून ओळख करुन दिली जाणार आहे. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अविनाश देवकाते, माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, अभिजीत जाधव, सुधीर पानसरे, शुभम ठोंबरे आदी उपस्थित होते.
नटराज नाट्य कला मंडळाचे प्रमुख किरण गुजर म्हणाले, बारामती दौऱ्यात हे तैलचित्र पाहण्यासाठी सुळे यांनी भेट दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात बीएमसीसी कॉलेजमध्ये 1958 साली गॅदरींगमध्ये “घडले बिघडले, या नाटकात ही छोटी भूमिका केली होती.
बारामती येथे रीमांड होम विभागाच्या 1961 मध्ये स्थानिक कलाकारांसमवेत आचार्य अत्रे यांच्या “वंदे भारतम’ यात कल्याण या नेतृत्व करणाऱ्या युवा कलाकाराची भूमिका केली.ही दोन्ही तैलचित्र आपल्याकडे असावीत यासाठी 1995 पासून प्रयत्न होता. त्यापैकी पहिले तैलचित्र दि. 12 डिसेंबर 2022 मध्ये नटराजमध्ये लावण्यात आले आहे. तर कॉलेजमधील भूमिकेचे तैलचित्र बनविण्याचे पुण्यात काम सुरु आहे. ते लवकरच या कलादालनात लावले जाणार आहे.