पिंपरी – पवना नदीच्या काठावरील चिंचवड येथील दशक्रिया विधी घाटावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत दै. प्रभातने “चिंचवड येथील दशक्रिया विधी घाटावर घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घाट परिसराची साफसफाई करण्यात आली. चिंचवड येथील दशक्रिया विधी घाट परिसरात व घाटावर मोठ्या प्रमाणावर गवत, कचरा, माती, कपडे, घाण आदी पडलेले होते. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले होते. घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबतचे वृत्त शनिवारी (दि. 12) प्रसिद्ध होताच महापालिकेच्या वतीने घाट परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे चिंचवड परिसरातील नागरिकांनी दै. प्रभातचे व महापालिकेचे आभार मानले आहेत. घाटाची स्वच्छता महापालिकेच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे येथील घाणीचे साम्राज्य कमी झाले आहे. परंतु पवना नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम करावे, अशी अपेक्षा या वेळी नागरिकांनी व्यक्त केली.