भाजप पुणे शहर महिला आघाडीची मागणी
पुणे – “हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देऊन बुधवारी केली.
पाटील म्हणाल्या, “संबंधित युवती नुकतीच पुण्यात एका क्लासच्या निमित्ताने राहण्यास आली होती आणि अचानक तिने आत्महत्या केली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
परंतु, एका मंत्र्यासोबतचे प्रेमसंबंधातून तिने आत्महत्या केल्याची सोशल मीडियावर चर्चा असून, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. याकरिता पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांना शासन करावे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम्ही दिला आहे.’