लंडन – गेले वर्षभर संपूर्ण जगच लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमधून जात असताना लक्षावधी नागरिकांचे प्राणहरणही झाले, तर अनेकांना विषाणूबाधेमुळे सामान्य जीवन कंठणे अशक्य झाले. करोनाविषाणूच्या फैलावामुळे पसरलेल्या कोव्हिड-19 या महामारीमुळे गेले वर्षभर बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. आता सर्वत्र अनलॉकची मोहिम यशस्वी ठरली असून कोव्हिड-19 चे प्राबल्य कमी झाले आहे. तसेच दुसरा विषाणूही कुचकामी ठरला आहे.
अशा स्थितीत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नागरिकांच्या मनोरंजनाची सोय करण्यासाठी इंग्लंडमध्ये चक्क एका अभयारण्यातच खुले नाट्यगृह बांधले जात आहे. इंग्लंडमध्ये साउथवॉल्डच्या जंगलात जगातील पहिले ओपन थिएटर तयार केले जात आहे. त्याचे काम या महिनाखेरीस पूर्ण होईल. हे प्रेक्षागृह पूर्णपणे लाकडाने साकारले जात आहे. याची 350 प्रेक्षकांची क्षमता आहे.
दिवसा झाडांची सावली व रात्री खुल्या आकाशाखाली कार्यक्रम आयोजित केले जातील. पर्यावरणप्रेमींचा विचार करून हे साकारले जात आहे. नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यासोबतच त्याद्वारे वेळोवेळी झाडांचे महत्वही सांगितले जाईल.
हे प्रेक्षागृह साकारणारे चार्लोट बॉंड म्हणाले, या थिएटरला “द थोरिंग्टन थिएटर’ असे नाव देण्यात आले आहे. नाट्य, संगीताधारित नाटकेही येथे पाहायला मिळतील. हे थिएटर प्रत्यक्षात आणण्यासाठी एकाही झाडाची कत्तल करावी लागली नाही. थिएटर बनत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन बॉम्ब कोसळले होते. येथे त्याची खूण म्हणून मोठा खड्डा दिसतो. खड्ड्यात जास्त झाडे नसल्याने हे प्रेक्षागृह साकारले.
आता लवकरच येथे विविध नाट्यप्रयोग साकारले जाणार असून नाट्यप्रेमींनी या अभिनव नाट्यगृहातील कार्यक्रमांत सहभागी होण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर त्याचे अन्यत्रही अनुकरण केले जाऊ शकते, असा विश्वास बॉंड यांनी व्यक्त केला आहे.