नगर – थकित वेतन, किमान वेतन व विमा संरक्षण देऊन जिल्ह्यातील रुग्णवाहिका 102 नंबरच्या कंत्राटी वाहन चालकांवरील अन्याय दूर करण्याची जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, अंकुश ठोकळ, गौरव बोरकर, दीपक गुगळे, सुशील नहार, शहानवाज शेख, वसीम शेख, अमोल भंडारे, श्रीपाद वाघमारे आदींसह कंत्राटी वाहन चालक उपस्थित होते.
जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे कंत्राटी वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वाहन चालकावर अन्याय करण्यात येत आहे. मागील 10 ते 18 महिन्यापासून वाहनचालकांचे वेतन देण्यात आलेले नाही. दिवाळीपुर्वी त्यांचे वेतन अदा करणे आवश्यक आहे. करोनाच्या संकटकाळात 24 तास काम सुरू असूनही शासनाने वाहनचालकास 50 लाखाचा विमा कवच दिलेला नाही.
वाहन चालकांवरील अन्याय दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावे, सर्व वाहनचालकांचे शासन निर्णयानुसार पी.एफ. कपात केली जावी, कै. ज्ञानेश्वर गोरे प्राथमिक आरोग्य केंद्र, टोका (ता. नेवासा) येथील वाहन चालक चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले आहे. परंतु शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत दिलेली नसून, त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.