इस्लामाबाद – पाकिस्तानातील उत्तरदायित्व न्यायालयाने इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवीन आरोप ठेवले आहेत. उच्च श्रेणीची ७ मनगटी घड्याळे आणि सरकारी भेटवस्तूंच्या भांडारातील अन्य १० मौल्यवान भेटवस्तू जवळ बाळगणे आणि त्यांची बेकायदेशीरपणे परस्पर विक्री करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
इम्रान खान पंतप्रधान असताना या भेटवस्तू मिळाल्या होत्या. तोशखानाशी संबंधित या नव्या प्रकरणी राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. तोशखाना भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा बिबी यांना यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात या दाम्पत्याला उत्तरदायित्व न्यायालयाकडून १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा नंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्थगित केली. इम्रान खान आणि बुशरा बिबी यांनी ग्राफ्ट आणि रोलेक्स सारख्या कंपन्यांची किंमती घड्याळे, हिऱ्यांचे दागिने तोशखानामध्ये जमा न करता आणि कायदेशीर मालकी नसताना परस्पर विकून टाकले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
खरेदी करणाऱ्यांनी या किंमती घड्याळांच्या किंमती ३० दशलक्ष रुपयांपर्यंत कमी करून ही खरेदी केली होती. बाजार भावानुसार या घड्याळांची किंमत १००.९ दशलक्ष रुपये इतकी होती. मात्र ही किंमत २०.१ दशलक्ष रुपयांना म्हणजे अवघ्या २० टक्के किंमतीला विकली गेली असा आरोप आहे. राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्थेने या प्रकरणी इम्रान खान आणि बुशरा बिबी यांना नोटीस बजावली असून या दाम्पत्याने या नोटीसीला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.