शिमला – बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना राणावत हिला सोमवारी हिमाचल प्रदेशमध्ये स्थानिकांनी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. त्या घटनेमुळे गोंधळ झाल्याने भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडणूक लढवत आहे. ती प्रचारासाठी लाहौल आणि स्पितीमधील एका ठिकाणी पोहचली. त्यावेळी तिच्या विरोधात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
कंगना गो बॅक आणि कंगना-वंगना नहीं चलेगी अशा घोषणाही त्यांनी दिल्या. कंगना हिने मागील वर्षी तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या विषयी एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्याचा निषेध म्हणून तिच्या विरोधात निदर्शने झाल्याचे समजते.
त्या निदर्शनांमुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजपने कंगना हिच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा आरोप केला. आमच्या सभेवेळीच लगतच्याच परिसरात कॉंग्रेसलाही सभेची परवानगी देण्यात आल्याचा दावाही त्या पक्षाने केला.
तशी परवानगी देण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवून केली.