पुरुषोत्तम जाधव लढविणार लोकसभेसह विधानसभा
कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, फलटण, माणमध्ये नाराजांनी थोपटले दंड
सातारा/नागठाणे/शिरवळ – भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात बंडाळीची लागण झाली आहे. भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आणि वाई विधानसभा मतदारसंघातून एकाच वेळी लढण्याची तयारी सुरू केली आहे.
ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या, पण आता शिवसेनेत जाणाऱ्या धैर्यशील कदम यांना झुकते माप मिळाल्याने कराड उत्तरमध्येही मनोज घोरपडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर केले आहे. फलटण-कोरेगाव राखीव मतदारसंघातही रिपाइंच्या दीपक निकाळजे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने तेथेही बंडखोरीची शक्यता आहे. कराड दक्षिणमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता आहे तर माण-खटावमध्ये शेखर गोरे, अनिल देसाई यांनी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला आहे. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुखही त्याच पवित्र्यात आहेत.
सातारा जिल्ह्यात महायुतीच्या जागावाटपामुळे अनेक जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्याचा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या जागा वाटपाच्या पहिल्या यादीत भाजपच्या वाट्याला सातारा (शिवेंद्रराजे भोसले), वाई (मदन भोसले), कराड दक्षिण (अतुल भोसले) व माण-खटाव (जयकुमार गोरे) हे मतदारसंघ तर शिवसेनेच्या वाट्याला कोरेगाव, फलटण, कराड उत्तर व पाटण हे मतदारसंघ आले आहेत.
महायुतीची दुसरी यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महेश शिंदे, कराड उत्तरमध्ये धैर्यशील कदम, पाटणमधून शंभूराज देसाई यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. मात्र, ही यादी अजून गुलदस्त्यात आहे. ही यादी उद्या, दि. 3 रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत उमेदवार निश्चित झाले तरी वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव व माण मतदारसंघात बंडखोरी माजण्याची चिन्हे आहेत. वाईमध्ये भाजपच्या मदन भोसले यांच्या विरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी करून दंड थोपटले आहेत.
वाई तालुक्यात नवीन नेतृत्व उभे राहू द्यायचे नाही, असा उद्योग काही राजकीय मंडळी करत असल्याचा आरोप करणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक एकाच वेळी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील घराणेशाही “झीरो’ करण्यासाठी आपण दुहेरी शड्डू ठोकत असल्याची भीमगर्जना पुरूषोत्तम जाधव यांनी शिरवळ येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात केली आहे.
जनतेचा आशीर्वाद हाच आपला वारसा असल्याचे सांगत ते उद्या (गुरुवार) शक्तिप्रदर्शनाने दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कराड उत्तरमध्ये भाजपमध्ये उशिरा येऊन तिखट झालेल्या धैर्यशील कदमांना भाजपने झुकते माप दिले आहे. हा मतदारसंघ महायुतीच्या वाटपात शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे धैर्यशील कदम हे उद्या शिवबंधन बांधून आपली उमेदवारी पक्की करणार आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या मनोज घोरपडे यांनी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मत्यापूर येथे झालेल्या मेळाव्यात घोरपडे यांनी बंडखोरी जाहीर केली. मी पाच वर्ष भाजपचे निष्ठेने काम केले.
महायुतीची कामे कराड उत्तरमधील तळागाळातील जनतेपर्यंत रुजवली. प्रामाणिकपणे काम केले, तरी मनोजदादांवर अन्याय झाला आहे. परतीचे दोर कापले असून आता माघार नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केला. माझी कोणतीही चूक नसताना दुसरा उमेदवार लादल्याचे मतदारांना रुचलेले नाही. त्यामुळे ही लढाई आता जनतेने हातात घेतल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले. शिवबंधन बांधलेल्या महेश शिंदे यांच्या विरोधात कोरेगावमध्ये किशोर बाचल यांनी शड्डू ठोकत अपक्ष उमेदवारीची तयारी चालवली आहे. माण-खटावमध्ये गोरे बंधूंमुळे महायुतीत तणाव आहे. शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपला सोडल्याने शिवसेनेत गेलेल्या शेखर गोरेंची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत गुरुवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरण्याची तयारी केली आहे. तेथे अनिल देसाईंबरोबर प्रभाकर देशमुखही बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
आमचे नेते शरद पवार आहेत, असे सांगत प्रभाकर देशमुख यांनी वेगळी चूल मांडली आहे. फलटण राखीव मतदारसंघ रिपाइंला सोडण्यात आला असून तेथे रामदास आठवले यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत असलेल्या दिगंबर आगवणे यांच्याकडून बंडखोरीची शक्यता आहे. आगवणे हे भाजपचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत.
राष्ट्रवादीने साताऱ्यात दीपक पवार, कोरेगावात शशिकांत शिंदे, वाईत मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील हे नावे अंतिम केली आहेत. मात्र फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर गटाची भूमिका स्पष्ट नसल्याने तेथील उमेदवारी गुलदस्त्यात आहे. पाटणमध्ये सत्यजित पाटणकर यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अंतिम मानली जात आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला असताना कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण व भाजपचे अतुल भोसले यांच्यात लढत आहे. तेथे माजी आमदार विलासकाका उंडाळकर यांच्या रयत क्रांतीचा प्रभाव आहे. कॉंग्रेसने संधी न दिल्याने काकांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील हेदेखील बंडखोरी करून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.