कराड – महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या उमेदवारीवर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आला असून आज (गुरुवारी) विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून कराड दक्षिणेत भव्य शक्तीप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण मतदार संघातून महायुतीने डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी घोषित केली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन डॉ. अतुलबाबा भोसले आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल करणार आहेत. त्यानंतर दत्त चौकातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. यावेळी श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, ना. नरेंद्र पाटील, ना. शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भीमरावदादा पाटील, ऍड. भरत पाटील, जयंतकाका पाटील, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, सुनील पाटील, बळवंतराव पवार, पोपटशेठ पाटील, रामकृष्ण वेताळ, अशोकराव भावके, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, व विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. दत्त चौकातून सुरू होणारी मिरवणूक कन्या शाळा येथे पोहोचल्यावर याठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.