भारतीय क्रिकेट संघ 19 ते 23 जानेवारी दरम्यान पार्ल आणि केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तीनही सामने आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग आहेत, त्यामुळे प्रत्येक सामन्यातील विजेत्याला 10 गुण मिळणार आहेत.
आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारताकडे पूर्ण ताकदीचा संघ नाही. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या दौर्यातून बाहेर पडला आहे, तर स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे. आपल्या फिटनेसवर काम करण्यासाठी हार्दिक पांड्याने या दौर्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी मालिकेत केएल राहुल प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. पाहुण्या संघाकडे त्यांचे काही प्रमुख खेळाडू नसले तरी ते मालिका जिंकण्यासाठी मुख्य दावेदार असतील. मात्र, असे असले तरी दक्षिण आफ्रिकेचे खालील तीन खेळडू भारताच्या विजयातील अडथळा ठरु शकतात.
लुंगी एनगिडी
लुंगी एनगिडीने चार वर्षांपूर्वी भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत चार सामन्यांत आठ बळींसह मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. तेव्हापासून एनगिडीच्या गोलंदाजी मध्ये खूप सुधारणा झाली आहे. त्याने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज सोबत आयपीएल 2021 जिंकले आणि आतापर्यंत भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 15 बळी घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असल्याने, एनगिडी या एकदिवसीय मालिकेत भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.
जेनेमन मलान
जनेमन मलानसाठी 2021 एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत वर्ष होते. उजव्या हाताच्या फलंदाजाने फक्त सात एकदिवसीय डावात 509 धावा केल्या आणि 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
भारताविरुद्धच्या आगामी मालिकेतही मलान याच वेगाने पुढे जाण्यास उत्सुक असेल. दक्षिण आफ्रिकेच्या या युवा फलंदाजाने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांची नोंद केली होती.
मलानचा ड्रीम फॉर्म कायम राहिल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत अडचणीत येऊ शकतो. तसेच भारतीय खेळाडू आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर मलानविरुद्ध कधीच खेळलेले नाहीत.
मार्को जॅन्सन
कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेनला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात प्रथमच संधी मिळाली आहे. जॅनसेन उंच वेगवान गोलंदाज आहे ज्याला दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत चांगली कामगिरी कशी करावी हे माहित आहे.
जरी त्याला एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नसला तरी, आयपीएल आणि सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मालिकेत त्यांच्याविरुद्ध खेळलेल्या भारतीय फलंदाजांच्या तंत्राची जानसेनला कल्पना आहे. कसोटी मालिकेत डावखुर्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांनी संघर्ष केला असल्याने, आगामी तीन सामन्यांमध्ये जॅनसेन पाहुण्यांना त्रास देऊ शकतो.