इंदूर – ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुन्हेमन, नाथन लियॉन व टॉड मर्फी यांच्या अफलातून फिरकी गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 156 धावा केल्या असून, त्यांच्याकडे 47 धावांची आघाडी आहे. उस्मान ख्वाजाने अर्धशतकी खेळी केली, मात्र तो बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातही एका बाजूने गडी बाद होत गेले. खेळ थांबला तेव्हा पीटर हॅण्ड्सकॉम्ब 7 तर कॅमेरुन ग्रीन 6 धावांवर खेळत आहेत. भारताकडून रवींद्र जडेजानेच चारही गडी बाद केले.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच अंगलट आला. रोहितने शुभमन गिलसह चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेले. रोहित 12, गिल 21, चेतेश्वर पुजारा 1, विराट कोहली 22, रवींद्र जडेजा 4, श्रेयस अय्यर 0, श्रीकर भरत 17, उमेश यादव 17, रविचंद्रन अश्विन 3, अक्सर पटेल नाबाद 12 व महंमद सिराज 0 असे आपले फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले.
गिल, कोहली, भरत, अक्सर यांनी थोडीफार चमक दाखवली. अखेरीस उमेश यादवने 2 षटकार व 1 चौकार फटकावत संघाला शतकी मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुन्हेमनने 5 गडी बाद केले. नाथन लियॉनने 3 तर टॉड मर्फीने 1 बळी मिळवला. गिल व कोहलीने सुरुवात चांगली केली होती. मात्र, त्यांनाही फिरकीसमोर अपयश आले.
Australia take a valuable lead on day one of the Indore Test 🏏#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/MFbjU9frC0 pic.twitter.com/qiDTWQMnHD
— ICC (@ICC) March 1, 2023
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ट्रेव्हीस हेडला रवींद्र जडेजाने लगेचच बाद केले. त्यानंतर ख्वाजाने मार्नस लेबुशेनच्या साथीत डाव सावरला व संयमी फलंदाजी करत संघाचे शतक धावफलकावर लावले. लेबुशेनचा 31 धावांवर जडेजाने त्रिफळा उडवला. त्याने या खेळीत तब्बल 91 चेंडू खेळताना 1 चौकार फटकावला.
ख्वाजाने सहजसुंदर फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 60 धावांवर बाद झाला. त्याने 147 चेंडूत 4 चौकार फटकावले. त्यालाही जडेजानेच तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथ शांतपणे खेळत होता. मात्र, त्यालाही जडेजाचा आर्मबॉल उमगला नाही व तो यष्टीरक्षक भरतकडे झेल देत बाद झाला. त्याने 38 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले. दिवअखेर पीटर हॅण्ड्सकॉम्ब व कॅमेरुन ग्रीन यांनी उरलेली षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. भारताकडून जडेजाने 63 धावांत 4 बळी मिळविले.
#NZvENG 2nd Test : न्यूझीलंडचा इंग्लंडवर अवघ्या एका धावेने विजय
खेळपट्टी ठरत आहे व्हिलन
इंदूरच्या खेळपट्टीवर थोडे गवत राखण्यात आले असले तरीही ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघांनी फिरकी गोलंदाजांवरच जास्त विश्वास दाखवला. पहिल्याच षटकापासून खेळपट्टी फिरकीला साथ देताना दिसली. तसेच ज्या स्पॉटवर चेंडू पडत होते तेथील मातीही उडताना दिसून आली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी 14 फलंदाज बाद झाल्याने आता ही खेळपट्टीच व्हिलन ठरत आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 33.2 षटकात सर्वबाद 109 धावा. (विराट कोहली 22, शुभमन गिल 21, श्रीकर भरत 17, उमेश यादव 17, अक्सर पटेल नाबाद 12, मॅथ्यू कुन्हेमन 5-16, नाथन लियॉन 3-35, टॉड मर्फी 1-23).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 54 षटकात 4 बाद 156 धावा. (उस्मान ख्वाजा 60, मार्नस लेबुशेन 31, स्टीव्ह स्मिथ 26, पीटर हॅण्ड्सकॉम्ब खेळत आहे 7, कॅमेरुन ग्रीन खेळत आहे 6, रवींद्र जडेजा 4-63).