जेजुरी, (वार्ताहर)- पुढील काळात शेतीवर अवलंबुन राहून चालणार नाही. त्याला उद्योगधंद्याची जोड दिली पाहिजे. औद्योगिकरणाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे तरच महाराष्ट्राची वेगाने प्रगती होईल असा विश्वास माजी केंद्रीय कृषी मंत्री ज्येष्ट नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
जेजुरी आद्योगिक वसाहतीमध्ये पदमभूषण श्री. शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुल व ह.भ.प.दादासाहेब सोनवणे बँडमिंटन कोर्टचे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय जगताप होते.
यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ शेवाळे, संभाजी झेंडे, सुदामराव इंगळे, दिलीप बारभाई, विजयराव कोलते, माणिकराव झेडे, शैलेश गुजर, दत्ता चव्हाण, जयदीप बारभाई, प्रदीप पोमण, अभिजित जगताप, सुधाकर टेकवडे, ॲड. धनंजय भोईटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, पूर्वी कारखानदारी मुंबई ठाणे परिसरात असायची. यशवंतराव चव्हाणांनी पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड भागात औद्योगिकरणाला चालना दिली. मात्र औद्योगिकरणाचे विक्रेंद्रीकरण केल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही, हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी महाराष्ट्राच्या विविध भागात औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले.
त्यातून जेजुरी, बारामती, चाकण, रांजणगाव, भिगवण, कुरकुंभ या ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. तरुणांना रोजगार मिळाला. आता तयार झालेला माल जगभर जातो. याचा मला सार्थ अभिमान आहे.
यावेळी आमदार संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रामदास कुटे यांनी जेजुरी उद्योजक संघटनेच्या वतीने राबविलेल्या कामाची माहीती दिली. क्रिडा संकुलासाठी शरद पवार यांनी २१ लाख रुपये दिले. उद्योजक पांडूरंग सोनवणे यांनी पाच लाखांची मदत दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे डॉ. सुनील जगताप, उद्योजक प्रशांत हिंगोराणी, उद्योजक पांडूरंग सोनवणे, उद्योजक रवी जोशी,
युवा उदयोजिका ऋतुजा सोनवणे यांची भाषणे झाली. सचिव राजेश पाटील, माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, शकील शेख, संभाजी जाधव, अनंत देशमुख, ऋतुराज सोनवणे, शेखर बारभाई, जालिंदर कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.डॉ. रामदास कुटे यांनी प्रास्ताविक केले. नितीन राऊत यांनी सुत्रसंचालन केले. दिप्ती जोशी, अनुजा कुटे, ऋतुजा सोनवणे यांनी आभार मानले.
हिंगोराणी, गांधी व झगडे यांना उद्योगभूषण पुरस्कार
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे इंडियाना ग्रुप ऑफ इंडस्टीजचे प्रशांत हिंगोरानी, आदीनाथ फुडसचे नितीन गांधी व ताज फ्रोजनचे उत्तमराव झगडे यांना शरद पवार यांच्या हस्ते उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पवार यांनी वसाहतीतील शेतीपुरक उद्योगाचे कौतुक केले. इंडियाना कंपनीच्यावतीने दुर्गम परिसरातील पिंगोरी येथील मुलींच्या शिक्षणासाठी अठरा सायकली पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.