सोरतापवाडी (वार्ताहर) – ऐन उन्हाळ्यात पूर्व हवेलीला शेतीसाठी व इतरत्र वापरण्यासाठी बेबी कालवा वरदान ठरत असून यामुळे पूर्व हवेलीतील शेती हिरवीगार दिसत आहे. या कालव्यामुळे पूर्व हवेलीतील शेतकर्यांचे नशीब बदलत आहे.
पुणे शहराच्या जवळ असणारा हवेली तालुका हा नवीन मुळा मुठा कालवा व जुना बेबी कालवा यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. पूर्व हवेलीतील अनेक गावांचा पाणी पुरवठा नवीन मुळा मुठा कालव्यावर अवलंबून आहे. तर जुना बेबी कालवा हा शेतीला वरदान ठरत आहे.
यंदा उन्हाळा जास्त असल्यामुळे शेतकर्यांना शेती करणे कठीण जात असून मुळा मुठा नदीतील पाणी मुंढवा येथील जॅकवेलद्वारे बेबी कालव्यात सोडले जात असून हा कालवा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पूर्व हवेलीतील शेतकर्यांना शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटलेला दिसत आहे.
मध्यंतरीच्या काळात जुना बेबी कालवा हा सात महिने अस्तरीकरणामुळे बंद होता. त्यामुळे कालव्याचा पाणी पुरवठा बंद केल्याने कांदा लागण तसेच उसाच्या लागणी बंद होत्या. पण आता बेबी कालव्याला पाणी असल्याने. या परिसरातील शेतकर्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत.
ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी वरदान ठरलेल्या या कालव्यामुळे ऊस, भाजीपाला, फुले इत्यादी पिके शेतकरी घेत असून शेतकर्यांना हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच सोरतापवाडी, कुंजीरवाडी, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन इत्यादी गावात नर्सरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून बेबी कालव्यामुळे नर्सरी व्यवसायाला मोठा हातभार या पाण्याचा लागलेला आहे.
नर्सरीमधील रोपांना रोज पाणी द्यावे लागत असून ऐन उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेती पिकाला जास्त पाणी लागते; परंतु बेबी कालव्यामुळे शेतकर्यांची व नर्सरी व्यवसायिकांची ही चिंता मिटली आहे. कालव्यामुळे पर्क्युलेशन होऊन विहीर व बोरवेलच्या पाण्याची पातळी टिकून असून त्या पाण्याचा शेती व इतरत्र वापर होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्यातील हे पाणी शेतकर्यांना देवदूतासारखे वाटत आहे.
जुना बेबी कालव्यामुळे पूर्व हवेलीतील शेतकर्यांची परिस्थिती सुधारत असून त्यामुळे उन्हाळ्यात शेती पिकाला पाणी मिळत आहे. हा बेबी कालवा नसता तर पूर्व हवेलीत अतिशय गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असती.
नवीन कालव्यामुळे ठराविक मर्यादित दिवसात पाणी मिळत असून, बेबी कालवा वाहत असल्यामुळे तो शेती व शेती पूरक व्यवसायाला नक्कीच वरदान ठरत आहे. -अशोक चौधरी, प्रगतशील शेतकरी व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सोरतापवाडी