पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता लागणारा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. दिव्यांग बांधवांकरिता कार्य करणार्या झुंज दिव्यांग संस्थेने केलेल्या मागणीची दखल घेऊन, ‘दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार्या संस्थेस अर्थसहाय्य देणे’अशी नवीन योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
झुंज दिव्यांग संस्था ही शहर व परिसरतील दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत दिव्यांगांचे एकूण 52 सामुदायिक विवाह सोहळ्यांचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यातून दिव्यांगांचा विवाह करणे, दाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देणे या सर्व बाबी देणगीदारांवर अवलंबून असतात.
अलिकडच्या काळात देणगीदारांकडून आवश्यक असलेली आर्थिक मदत प्राप्त होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे शक्य होणार नाही. त्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेतून दिव्यांग विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता आर्थिकसहाय्य मिळावे, अशी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झुंज दिव्यांग संस्था ही एकमेव संस्था सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते. महापालिकेच्या कार्यक्षेत्रा त राबविला जाणारा हा उपक्रम एकमेव आहे.
आर्थिक मदतीशिवाय हा उपक्रम पुढे सुरू ठेवणे शक्य नाही. या सर्व बाबींचा विचार करून, महापालकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कल्याणकारी योजनेमार्फत राबविल्या जाणार्या ‘मानव हिताच्या दृष्टीकोनातून का करणार्या सार्वजनिक संस्था, सार्वजनिक ट्रस्ट यांना ऐच्छिक अनुदान देणे’ या योजेच्या धर्तीवर दिव्यांगांच्या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करणार्या संस्थेस अर्थसहाय्य देणे’ अशी नीवन योजना कार्यान्वित करण्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
दिव्यांग बांधवांच्या विवाहाकरिता समाजात फारशी जागृती नाही. त्यामुळे झुंज दिव्यांग संस्थेकडून पुढाकरा घेत, हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक दिव्यांगांचे संसार उभे राहिले आहेत. मात्र, आर्थिक चणचणीचा विषय मार्गी लागल्याने या घटकाला मोठा दिलासा मिळाला आहे.