मुंबई – प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इंदोरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून सत्र न्यायालयात खटला चालणार आहे.
इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी लिंगभेदावर भाष्य केले होते. मात्र, हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT (पीसीपीएनडीटी ) सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला इंदुरीकर महाराजांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केल्याने इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला होता. या निर्णयाला याचिकाकर्ते ऍड. रंजना गवांदे यांनी वकील जितेंद्र पाटील यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते.
त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला असे याचिकाकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील यांनी काहीदिवसांपूर्वी सांगितले होते.
सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला होता. त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे इंदोरीकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून आता सत्र न्यायालयामध्ये आता परत खटला चालणार आहे.
काय होत इंदोरीकर महाराज यांचं ते वक्तव्य…
‘सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते. तसेच स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर आपत्य रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात’, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी वारंवार आपल्या कीर्तनातून करत पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले होते.