कात्रज, दि. 17 (प्रतिनिधी) -निवडणुकीत महिलांना संधी दिल्यास त्या निवडून येतील की नाही, याची आपल्या देशात अनेक पक्षाच्या नेत्यांना भिती असते. त्यामुळे कर्तृत्ववान महिला असून देखील त्यांना संधी मिळत नाही. मात्र अनेक कर्तृत्ववान महिला या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. हे भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांनी घालून दिलेला आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले.
पुणे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आयोजित “सिंगल डॉटर फॅमिली’ या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश जगताप, मुख्य विश्वस्त डॉ. सुनिल जगताप, सचिव डॉ. दिपाली वाघ, सह सचिव डॉ. नीरज जाधव आदी उपस्थित होते. यावेळी एक मुलगी असलेल्या डॉक्टर दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आरक्षण दिल्यानंतर महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मी मुख्यमंत्री असताना यासंबंधी निर्णय घेताना अनेकवेळा विरोध झाला. परंतु, आज निवडून आलेल्या महिला उत्तम काम करीत आहेत. त्यावरून त्यांचे नेतृत्व गुण सिद्ध होत आहेत. संसदेत ज्यावेळी मी महिलांना संधी देण्यासंदर्भात बोलायचो त्यावेळी खासदार उठून जायचे. परंतु ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. महिलांनाही त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे याच्या कार्यातून मला नेहमी प्रेरणा मिळते व त्यातूनच मी महिलासाठी काय करता येईल, यासाठी प्रयत्नशील असतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त डॉ. सुनील जगताप, उपाध्यक्ष डॉ. रणजीत घाटगे, सहखजिनदार डॉ. चंद्रशेखर जावळकर, माजी आध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे व नियोजित अध्यक्ष डॉ. राज लवंगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुलक्षणा जगताप व सहसचिव डॉ. नीरज जाधव यांनी केले. प्रास्ताविक सचिव डॉ. दिपाली वाघ व डॉ. अंबिका गरड यांनी आभार मानले.