पुणे – शिवसेनेने हिंदूत्वापासून दूर होताना, मनसेला जागा निर्माण करून दिली जात आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले. कोथरूड विधानसभा मतदारासंघातील प्रलंबित विकासकामांबाबत पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नुकतेच पहिले अधिवेशन पार पडला. त्यात मनसेने कात टाकत आपल्या पक्षाची नव्याने ध्येयधोरणे ठरवत पक्षाचा झेंडादेखील बदलला. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मनसेवर हिंदुत्वाच्या वाटेवर धरली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती. मात्र, सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. कारण दोघांच्या विचारांत आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आमही एकत्र येऊ शकत नाही. मात्र, भविष्यात मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मनं जुळली तर युती होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भाजपाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.