नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 28 एप्रिलपर्यंत भारताचा परकीय चलन साठा 4.532 अब्ज डॉलरने वाढून तो 588.780 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.त्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 2.16 अब्ज डॉलर्सची घट झाली होती.
दरम्यान या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेकडील सोन्याचा साठा 494 दशलक्ष डॉलर्सने घसरून 45.657 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने सुमारे 645 अब्ज डॉलर्स इतका उच्चांक गाठला होता. परंतु नंतरच्या काळातील दोलायमान आर्थिक स्थिती मुळे देशातील परकीय चलन साठ्यात घटच झाल्याचे दिसून आले होते.
या पार्श्वभूमीवर आरबीआयने या स्थितीत हस्तक्षेप करून अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे परकीय चलन साठ्याची स्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. वाढत्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेल्या रुपयाचे रक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बाजारात हस्तक्षेप केल्यामुळे परकीय चलन गंगाजळी मोठ्या प्रमाणात घसरली होती.सामान्यतः, रुपयाचे अवमूल्यन रोखण्याच्या उद्देशाने, आरबीआय वेळोवेळी, तरलता व्यवस्थापनाद्वारे, डॉलरच्या विक्रीसह बाजारात हस्तक्षेप करते.