नाशिक – महाराष्ट्र दिनाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक मिळवलेल्या नाशिकमधील पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली. त्याच पोलीस निरीक्षकावर फसवणुकीसंदर्भात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात वाढलेली गुन्हेगारी, नाशिक पोलिसांच्या संदर्भात वाढलेल्या तक्रारी यामुळे नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एका महिला तक्रारदाराने 2016 मध्ये फसवणुकप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढील तपासासाठी हा गुन्हा उपनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.
याच सुमारास पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी वेगवगेळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचे महिला तक्रारदाराने न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयात फसवणूक तसेच अपहाराच्या जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराकडून चार लाखांची खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सन 2016 मध्ये महात्मानगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने फसवणुकीसंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा दाखल गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग केला होता. तेव्हा गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक माईनकर होते. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.
त्रयस्थ व्यक्तीमार्फत चार लाखांची खंडणी मागितल्याचे न्यायालयात दाखल दाव्यावर नमूद आहे. त्यामुळे खंडणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कांदे यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यानुसार माईनकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी गंगापूर पोलीस तपास करत आहेत.